किरकोळ वादातून लॉजमालकाच्या डोक्यात हातोड्याने वार; पिस्तूलाचा धाक दाखवून आरोपी पसार

0
729

पुणे, दि. ४ (पीसीबी) – किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून दोघा ग्राहकांनी एका वयोवृध्द लॉजमालकाच्या डोक्यात हातोड्याने वार करुन जखमी केले. त्यानंतर पिस्तूलाचा धाक दाखवून फरार झाले. ही घटना बुधवारी (दि.३) दुपारच्या सुमारास लष्कर भागातील राजतिलक या लॉजवर घडली.

रविंद्र अग्रवाल (वय ७२) असे जखमी लॉज मालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र अग्रवाल यांचे कॅम्प परिसरात राजतिलक लॉज आहे. बुधवारी दुपारी दोन व्यक्ती त्यांच्या लॉजमध्ये आल्या. हे दोघेही पूर्वीचे ग्राहक असल्याने अग्रवाल यांनी त्यांच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. गप्पा मारता मारता त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि त्यातील एकाने अग्रवाल यांच्या डोक्यात तीन वेळा हातोड्याने वार केले. तर दुसऱ्याने व्यक्तीने अग्रवाल यांना पिस्तूलाचा धाक दाखवून तेथून पळ काढला. यात गंभीर जखमी झालेल्या अग्रवाल यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. लष्कर पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असून त्याआधारे दोघा आरोपींचा शोध घेत आहेत.