“काही टोकाचे निर्णय घेतले. पण आता फेरविचाराची गरज. काही काळ संपर्क होणार नाही’ : खासदार डॉ. अमोल कोल्हेंची सूचक पोस्ट

0
273

पिंपरी, दि. 7 (पीसीबी): शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे. घेतलेल्या निर्णयाचा विचार आणि कदाचित फेरविचार करण्याचा मनसुभा त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये बोलून दाखवला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी चिंतनासाठी एकांतवासात जात असल्याचे म्हटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणूक तोंडावर असतानाच डॉ. कोल्हे यानी एकांतवासत जाण्याचा निर्णय का घेतला यावर आता चर्चा होत आहे.

सिंहावलोकनाची वेळ आल्याचे डॉ. कोल्हे का म्हणाले याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. ‘गेल्या काही दिवसांत, महिन्यांत आणि वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो. काही टोकाचे निर्णय घेतले. काही अनपेक्षित पावलं उचलली गेली. पण, हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. तो थोडा शारीरिक, बराचसा मानसिक आहे. शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल; पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं, थोडं मनन आणि थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचारसुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय… काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने!! या फेसबुक पोस्टवर त्यांनी टीपही लिहिली असून फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही,’ असे अमोल कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

2019 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या निवडणुकीत त्यांनी शिरूरमधून तीन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.