‘काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा वापर करावा’; पाकिस्तानच्या खासदारांच खळबळजनक वक्तव्य

0
420

इस्लामाबाद, दि.१९ (पीसीबी) : अनेक देशांमधून पॅलेस्टाइनवर इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्याविरोधात विरोध सुरू आहे. आखाती आणि इस्लामिक देशांमधून इस्रायलविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानचे खासदार मौलाना चित्राली यांनी इस्रायलविरोधात जिहाद पुकारण्याचे आवाहन करत अणवस्त्रांचा वापर करण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानच्या संसदेत बोलताना खासदार मौलाना चित्राली यांनी पॅलेस्टाइन आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सरकारने अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा वापर करावा असे म्हटले. त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला कि,’अणवस्त्र काही संग्रहालयात ठेवण्यासाठी आहेत का?’

पॅलेस्टाइन आणि काश्मीरला स्वातंत्र करू शकत नसू तर विशाल सैन्य, अणवस्त्र, क्षेपणास्त्रांची काहीही आवश्यकता नाही असेही त्यांनी म्हटले. पॅलेस्टाइनवर इस्रायलने हल्ला केल्यानंतर पाकिस्तान आणि तुर्कीकडून मु्स्लिम देशांची सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानने पॅलेस्टाइनला करोना मदत पाठवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, इस्रायलकडून गाझापट्टीवर सुरू असलेल्या हल्ल्याविरोधात पॅलेस्टाइनच्या नागरिकांनी मंगळवारी संप पुकारला. या संपात पॅलेस्टाइनसह इस्रायल आणि इस्रालयने ताब्यात घेतलेल्या प्रदेशातील पॅलेस्टिनी नागरिकांनी सहभाग घेतला. दरम्यान, इस्रायलने गाझा शहरातील इमारतींवर हवाई हल्ला सुरूच ठेवला असून गाझातूनही हमासने रॉकेट हल्ला केला.