काँग्रेस पक्ष गरजू मजुरांच्या रेल्वेच्या तिकीटाचा खर्च उचलणार

0
321

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) : कोरोना लढाईविरोधात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर देशातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. जवळपास एक महिन्यानंतर त्यांना आपापल्या घरी जाण्यासाठी परवानगी मिळाली खरी पण केंद्र सरकारने रेल्वेच्या तिकीटाचा खर्च मजुरांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला. यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष गरजू मजुरांच्या रेल्वेच्या तिकीटाचा खर्च उचलणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. प्रदेश काँग्रेस कमेटीची प्रत्येक शाखा मजूर-कामगारांना घरी परतण्यासाठी रेल्वेच्या तिकीटाचा खर्च उचलेल आणि आवश्यक पावले उचलली जातील. काँग्रेसने या संदर्भात एक पत्रक जारी करुन म्हटले आहे की, केवळ चार तास देऊन लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशातील मजूर, कामगारांना आपापल्या घरी जाता आले नाही. 1947 नंतर देशाने पहिल्यांदाच अशाप्रकारची परिस्थिती पाहिली ज्यात लाखो मजूर हजारो किमी पायपीट करुन घरी जात आहेत.