काँग्रेस नेते सिद्धूला एक वर्षे कारावासाची शिक्षा

0
203

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) : ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर सिद्धू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी कायद्याचं पालन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सिद्धू यांचे 1988 मध्ये पटियाला येथे पार्किंगवरून भांडण झाले होते. यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक हजाराचा दंड ठोठावून सुटका केली होती. त्याविरोधात पीडित व्यक्तीच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.

27 डिसेंबर 1988 रोजी नवज्योत सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर सिंह संधू यांचा पटियाला येथे कार पार्किंगवरून गुरनाम सिंग नावाच्या एका वृद्ध व्यक्तीसोबत वाद झाला होता. या लढाईत गुरनामचा मृत्यू झाला. सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदरसिंग संधू यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंजाब सरकार आणि पीडितेच्या कुटुंबाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1999 मध्ये सत्र न्यायालयाकडून सिद्धू यांना दिलासा मिळाला आणि खटला फेटाळण्यात आला. न्यायालयाने म्हटले होते की आरोपींविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि अशा प्रकरणात केवळ संशयाच्या आधारे खटला सुरू करता येणार नाही. परंतु 2002 मध्ये राज्य सरकारने सिद्धूंविरुद्ध पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका केले.

1 डिसेंबर 2006 रोजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सिद्धू आणि त्यांच्या मित्राला दोषी ठरवले. 6 डिसेंबर रोजी सुनावण्यात आलेल्या निकालात सिद्धू आणि संधू यांना तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. 10 जानेवारी 2007 पर्यंत सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. दोन्ही आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर 11 जानेवारी रोजी चंदीगड न्यायालयात आत्मसमर्पण केले. 12 जानेवारीला सिद्धू आणि त्यांच्या मित्राला सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. यानंतर तक्रारदाराने सुप्रीम कोर्टात जाऊन सिद्धू यांना हत्येप्रकरणी दोषी ठरवण्याची मागणी केली.