काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, राज ठाकरे यांची भेट

0
817

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची  आज (गुरूवार) भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची  मानली जात आहे. तर या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली,  ते समजू शकलेले नाही.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी मोदी आणि शहा यांच्याविरोधी भूमिका घेतली होती. त्याबाबत आपण समाधान व्यक्त  करून त्यांना भेटलो, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरेंना सोबत घ्यायचे की नाही याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील,  असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा देशभरात दारूण पराभव  झाला.  महाराष्ट्रात काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले.  आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी  सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट ही महत्त्वाची मानली जाते आहे.  मात्र, ही एक सदिच्छा भेट होती,  हे सांगत याबाबत फार काही बोलणे माणिकराव ठाकरे यांनी टाळले.