काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

0
360

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याचा  प्रस्ताव मांडून दोन दिवस झाल्यानंतरही राहुल गांधी यांनी कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. राहुल यांनी शनिवारनंतर कोणत्याही राजकीय कार्यक्रमास हजेरी लावलेली नाही. ते काँग्रेसच्या नव्या खासदारांनादेखील भेटलेले नाहीत. त्यामुळे राहुल गांधी पक्षाध्यक्षपद सोडण्याच्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत, असे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत फार थोडय़ा जागांमध्ये वाढ झाली असली, तरी १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे देशातील या सर्वात जुन्या पक्षाची सूत्रे आता गांधी घराण्याबाहेरील नेत्याच्या हाती दिली जावीत, अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर चिंतन  करण्यासाठी शनिवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी राहुल यांचा प्रस्ताव एकमताने फेटाळला  आहे. गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीनेच पक्षाध्यक्षपद सांभाळावे, या मतापासून राहुल यांना परावृत्त करण्यात काँग्रेस नेत्यांना  अजूनही यश आलेले नाही.