कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी जितेंद्र कदम यांच्या वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षाव

0
341

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचा मंगळवारी (दि. 25) वाढदिवस. कार्यक्षम, कर्तव्यदक्ष असलेले जितेंद्र कदम यांच्यावर शहरातील विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ठराविक उल्लेखनीय कामगिरीचा आढावा ‘पीसीबी टुडे’ने घेतला. दरम्यान, कदम यांच्या वाढदिवसा निमित्त शहरातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमाताई सावळे, माजी नगरसेविका आशा धाडगुडे- शेंडगे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते परमानंद जमतानी यांनी कमद यांच्या कार्याचा गौरव केला.

डिसेंबर 2020 मध्ये कदम यांनी भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) असताना सराईत वाहन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून शेकडो दुचाकी जप्त केल्या. हे चोरटे शहरात वाहने चोरून त्याची राज्यभरात ठिकठिकाणी विल्हेवाट लावत असत. कदम यांनी कारवाई करत वाहन चोरट्यांचे कंबरडे मोडले होते.

जुलै 2021 मध्ये एका सराईत वाहन चोरट्याला अटक करत त्याच्याकडून एक कोटी एक लाख रुपये किमतीच्या 12 दुचाकी आणि दहा आलिशान कार जप्त केल्या होत्या.

भोसरी येथे कार्यरत असतानाच ; येरवडा कारागृहातील सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात राहून पिंपरी-चिंचवड शहरातील अन्य गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना शस्त्र विक्री करणा-या एका टोळीचा कदम यांनी पर्दाफाश केला होता. यातील काही गुन्हेगारांना मध्य प्रदेश मधील जंगल परिसरात पाठलाग करत अटक करण्यात आली होती. या गुन्हेगारांकडून 24 पिस्टल आणि 38 जिवंत काडतुसे असा भलामोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

सन 2021 मध्ये जितेंद्र कदम यांनी आणखी एक दमदार कामगिरी केली. एक सराईत चोरटा एखाद्या ठिकाणी घरफोडी करताना सीसीटीव्ही कॅमे-यात दिसत असेल आणि पोलीस शोध घेत असल्याचा संशय आल्यास तो थेट नजिकच्या पोलीस ठाण्यात हजर व्हायचा. अशा पद्धतीने त्याने आजवर तब्बल 87 घरफोड्या केल्या. या कुविख्यात चोरट्याला कदम यांनी अटक करत त्याच्यावर कठोर कारवाई केली.

खेड तालुक्यातील महाळुंगे येथे कंपनीत पाणी पुरवण्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एका व्यावसायिकावर कोयत्याने वार करत भर रस्त्यात त्याचा खून केला. या गुन्ह्यातील आरोपींना जितेंद्र कदम यांच्या पथकाने जेरबंद केले होते.

भोसरी परिसरातील पांजरपोळ येथील एसबीआयचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने फोडले. चोरट्यांनी एटीएम मधून 22 लाख 95 हजार 600 रुपयांची रोकड चोरून नेली. या गुन्ह्याचा छडा लावण्यात देखील कदम यांना यश मिळाले. जितेंद्र कदम यांच्या पथकाने थेट हरियाणा येथे जाऊन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.

गुन्हे शाखेत कार्यरत असताना जितेंद्र कदम यांनी एका गुन्हेगाराला अटक केली. तो 20 वर्षांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता. हा गुन्हेगार पिंपरी येथे गुन्हा करून पुणे शहरातील कोंढवा येथे लपून छापून वास्तव्य करीत होता.