करोनाच्या संकटकाळातून सावरतीयं पृथा, राज्य विजेतेपदाची हॅटट्रिक

0
231

पुणे, दि. २१ (पीसीबी) : सर्व क्षेत्राला शून्यात आणून ठेवणाऱ्या करोनाच्या संकटकाळावर यशस्वी मात करत पुण्याच्या पृथा वर्टिकर हिने राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. मुंबईत सुरू असलेल्या ८२व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तिने अनन्या चांदेला हिचा ८-११, १५-१३, १०-१२, ११-५, १५-१३, १०-१२, ११-६ असा पराभव करून ही कामगिरी केली.

मोठी बहिण पूर्वा हिच्याकडून प्रेरणा घेत पृथा टेबल टेनिस खेळायला लागली. पूर्वाने दहावीनंतर खेळ सोडला, पण पृथाने खेळ कायम ठेवला आणि आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पृथाने २०१६ मध्ये १२ वर्षांखालील गटात पहिले राज्य विजेतेपद मिळविले आणि तेव्हापासून तिने मागे वळून बघितले नाही. चॅम्पियन्स टेबल टेनिस अॅकॅडमीत सोमेन शहा यांच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या पृथाने २०१८ मध्ये १५ वर्षांखालील गटात पहिले विजेतेपद मिळविले. नंतर तिने २०१८ मध्येही ही कामगिरी केली आणि आता सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली.

पृथाने गेल्यावर्षी सातत्यपूर्ण कामगिरी करताना १५ वर्षांखालील गटात राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. राष्ट्रीय मानांकनात ती अव्वलही आली होती. आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा तिचा मार्ग मोकळा झाला होता. पण, करोनाच्या संकटकाळाने सगळ्यावरच पाणी पडलं. इतर खेळाडूंप्रमाणे तिचीही मेहनत वाया गेली. या कालावधीत ती प्रचंड निराश झाली होती. पण, आई म्हणून मी आणि प्रशिक्षकांनी तिला समजावून पुढे उभे राहण्यासाठी तयार केले, असे पृथाची आई प्रिया वर्टिकर यांनी सांगितले. अमूक एक गोष्ट करायची म्हटली की ती करायची असा स्वभावाची पृथा या करोनाच्या कालावधीत निराश झाली होती. आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची तिची संधी हुकली होती. पण, ही वेळ अशीच राहणार नाही. स्वतःला तंदुरुस्त ठेव आणि मनाची तयारी कर अजून ही वेळ गेलेली नाही. खूप कारकिर्द बाकी आहे, अशी तिची समजूत काढली आणि तिला तयार केल्याचे तिच्या आईने सांगितले.

सराव आणि खेळ पूर्णपणे बंद असताना पृथाला रोज दोन तास फिटनेस आणि शॅडो प्रॅक्टिस करायची. तिचे प्रशिक्षक तिच्याकडून ऑनलाईन करून घ्यायचे. त्यामुळेच करोनानंतर सुरू झालेल्या स्पर्धात्मक पातळीवर तिने घवघवीत यश मिळवून आपला लौकिक कायम राखला. आता ती याच स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात खेळत आहे.

अंतिम लढतीत या वेळी तिला अनन्याचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. पहिली गेम गमावल्यावर तिने दुसरी गेम जिंकून बरोबरी साधली. पण, पुन्हा तिसरी गेम तिने गमावली. चौथ्या गेमला पृथाने अनन्याला संधीच दिली नाही. पाचव्या गेमलाही अनन्याचा प्रतिकार मोडत तिने गेम जिंकली. तरी, सहाव्या गेमला अनन्याने बाजी मारून चुरस वाढवली. अखेरच्या निर्णायक गेमला मात्र पृथाने जोरदार खेळ करत अनन्याला निष्प्रभ केले.