‘कंपनीत काम दे नाहीतर महिन्याला खंडणी दे’ म्हणत ‘या’ व्यावसायिकाला मारहाण; नक्की काय आहे प्रकरण

0
272

चाकण, दि.१४ (पीसीबी) – कंपनीत सुरु असलेले डेव्हलपिंगचे काम मला दे, नाहीतर मला महिन्याला 50 हजारांची खंडणी दे’ अशी धमकी देत सहा जणांनी मिळून एका व्यावसायिकाला मारहाण केली. तसेच ‘पोलिसात तक्रार दिल्यास तुला गोळ्या घालून मारून टाकीन’ अशी धमकी दिली. हा प्रकार बुधवारी (दि. 13) दुपारी खेड तालुक्यातील भांबोली येथे घडला.

संतोष मांजरे (रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड), नारायण घावटे (रा. शेलू, ता. खेड), सोन्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि अन्य तीन अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय शिवाजी राऊत (वय 31, रा. भांबोली, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदानंद मोल्ड अँड टूल्स प्रा ली या कंपनीत डेव्हलपिंगचे काम फिर्यादी राऊत यांच्याकडे आहे. आरोपी संतोष याने बेकायदेशीर गर्दी जमवून राऊत यांना ‘कंपनीतील डेव्हलपिंगचे काम मला पाहिजे. त्यामुळे तुझे कंपनीमध्ये चालू असलेले डेव्हलपिंगचे काम बंद कर. तुला जर डेव्हलपिंगचे काम चालू ठेवायचे असेल तर तुला महिन्याला 50 हजार रुपये खंडणी म्हणून द्यावे लागतील. मला तू महिन्याला 50 हजार रुपये खंडणी दिली नाहीस, तर मी तुला डेव्हलपिंगचे काम करून देणार नाही. तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली.

फिर्यादी राऊत यांनी खंडणी देण्यास नकार दिला. तसेच काम बंद करणार नसल्याचेही आरोपींना सांगितले. त्यावरून आरोपींनी राऊत यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खुर्ची फेकून मारली. त्यात राऊत जखमी झाले. ‘तू जर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुला गोळ्या घालून मारून टाकीन’, अशी आरोपींनी राऊत यांना धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.