औरंगाबादमध्ये मद्यधुंद ट्रकचालकाने १० जणांना उडवले; एकाचा मृत्यू

0
509

औरंगाबाद, दि. ३ (पीसीबी) – शहरातील चेलीपुऱ्यातील अफलातून मशिदीसमोर रस्त्यावर मद्यधुंद ट्रक चालकाने १० जणांना उडवल्याची घटना समोर आली. यात एका २२ वर्षीय तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मद्यधुंद चालकाला संतप्त जमावाने बेदम चोप देत ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात स्थानिकांनी गर्दी केली होती.

शेख मोहसीन शेख अमीन (वय २६) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शेख इमाम शेख (वय २६) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा टायरचा ट्रक सिल्लोडहून मका भरून निघाला होता. या ट्रकने फुलंब्रीत काही वाहनांना धडक दिली. त्यामुळे या भरधाव निघालेल्या ट्रकला थांबविण्यासाठी

फुलंब्रीतून काही तरुणांनी पाठलाग सुरू केला. यामुळे ट्रकचालक सुसाट निघाला.  त्यानंतर सावंगी फाट्यावर त्याने दोन वाहनांना उडवल्यानंतर काही स्थानिक दुचाकीस्वार त्याचा पाठलाग करत असल्याने त्याने ट्रक शहरातील हर्सूल परिसरात वळवला. हर्सूलमध्ये घुसताच त्याने जळगाव टी पॉईंटवरही दोन ते तीन रिक्षांना धडक देत पाणीपुरीच्या ठेल्याला उडवले. निजामोद्दीन चौकातून वळल्यावर चंपा चौकमार्गे जमजम हॉटेलसमोर जाताच मोठ्या जमावाने त्याला अडवले व ट्रक थांबवला. परिसरात नागरिकांची गर्दी झाल्याने दुकाने झटपट बंद करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली होती. शेवटी पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहीती दिली. आमदार इम्तियाज जलील आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होत नागरिकांना शांततेचे आवाहन केले.