“ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही; आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू”

0
168

मुंबई,दि.१३(पीसीबी) – आज भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची बैठक पार पडली. या कार्यकारिणीला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का दिला जाणार नाही, याबाबतचं कलम टाकलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं आहे, असं सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी आरक्षणात कोणीही वाटेकरी नको. ही भाजपची अधिकृत भूमिका आहे. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही ओबीसी आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानच त्यांनी यावेळी दिलं. ओबीसी आरक्षणावरून दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांमध्येच वेगवेगळ्या भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली.

दरम्यान यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील ओबीसी मंत्र्यांवरही टीका केली. ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी करत ओबीसी मंत्री बाहेर आंदोलन करत आहेत. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत गप्प बसतात. काहीही करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.