ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यासा गुरुवारपासून सुरवात

0
270

अॅडलेड, दि.१५ (पीसीबी) : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यासा गुरुवारपासून सुरवात होत असून दोन्ही संघांदरम्यान हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया वर्चस्व राखण्यासाठी घरच्या मैदानावर खेळताना उत्सुक असले, तरी एकूण परिस्थिती लक्षात घेता दोन्ही संघांना खेळाडूंच्या तंदुरुस्ती आणि अचूक संघ निवडणच्या प्रश्नाने सतावले आहे.

द्विपक्षीय मालिका असली, तरी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या बदलत्या समीकरणामुळे चेंडू पडण्यापूर्वीच या कसोटी मालिकेस आगळे महत्व आले आहे. दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेहमी वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत ते सात दिवस-रात्र कसोटी सामने खेळले असून, सातही सामने ते जिंकले आहेत. यातील चार सामने अॅडलेडवर झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ असा मालिका विराट कोहलीच्या नेतृत्वा खाली भारताने २०१८-१९ मध्ये विजय मिळविला होता. मात्र त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे प्रमुख खेळाडू नव्हते. या वेळी मात्र वॉर्नर दुखापतीने खेळणार नाहीये, तर स्मिथने आज पाठीच्या दुखापतीने सरावात सहभाग घेतला नाही. यानंतरही ऑस्ट्रेलिया गेल्या मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक आहे. कोरोनाच्या संकटामुळे प्रेक्षकांच्या उपस्थितीवर मर्यादा असल्या तरी पन्नास टक्के म्हणजे २० हजार प्रेक्षक पहिल्या दिवशी उपस्थित असतील अशी अपेक्षा संयोजकांना आहे. आजच्या सरावानंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर म्हणाले,’ऑस्ट्रेलिया भारत यांच्यातील लढत म्हणजे क्रिकेटचा वेगळाच आनंद असतो. दोन्ही संघांची ताकद समान असल्यामुळे एक निकोप स्पर्धा या वेळी बघायला मिळेल. या वेळी आमच्या संघात वरिष्ठ खेळाडू आहेत. आम्ही आमचा लौकिक दाखविण्यासाठी सज्ज आहोत.’

कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज असला तरी तंदुरुस्तीचा प्रश्न त्यांच्यासमोरही कमी अधिक प्रमाणात आहेच. रवींद्र जडेजा जखमी झाला आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा पहिल्या दोन सामन्यात खेळू शकणार नाही. यष्टिरक्षक वृद्धिमान साहा संघासोबत असला, तरी त्याच्या तंदुरुस्तीविषयी अजून काहीच कल्पना नाही. सराव सामन्यात त्याने यष्टिरक्षण केले नव्हते. त्याच बरोबर संघ निवडीचा प्रश्नही संघ व्यवस्थापनाला सतावत असेल. सलामीपासून मधली फळी काय असावी याविषयी अजून केवळ चर्चाच आहे. सलामीला राहुला ठेवून त्याच्या साथीला मयांक, गिल की शॉ यांच्यापैकी कुणाला संधी द्यायची या प्रश्नानाने सुरवात होते. मध्येच मयांक-गिल किंवा गिल-शॉ अशी सलामीची जोडी खेळवायची. मग राहुलला मधल्या फळीत कुठेत सामावून घ्यायचे हा पुढचा प्रश्न. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यानंतर यष्टिरक्षक आणि नंतर एक फलंदाज अशी फलंदाजांची मोट बांधताना चार गोलंदाज घेऊन खेळायचे की पाच गोलंदाज आणि पाच फलंदाज हा आणखी एक प्रश्न त्या वेळी उभा राहतो. अर्थात, कर्णधार कोहलीने चिंता नसावी आमचा संघ चांगला तयार असल्याचे म्हटले आहे.

तुलनेत भारत आतापर्यंत केवळ एकच दिवस-रात्र कसोटी सामना खेळले आहेत. गेल्यावर्षी कोलकत्यात ते बांगलादेशविरुद्ध हा सामना खेळले. पण, त्यांनी केवळ दोन दिवसात विजय मिळविला. त्यामुळे त्यांना दिवसरात्र खेळण्याचा फारसा अनुभव मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर सिडनी येथे झालेल्या सराव सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी चांगला सराव करून घेतला.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे काही वेगळे नाही. त्यांचे एकेक खेळाडू सराव सामन्यापासून गळायला लागले आहेत. उसळत्या चेंडूंचा मारा लागून त्यांचे दोन फलंदाज बाहेर पडले. वॉर्नर आधीच बाहेर आहे. त्यामुळे त्यांनी मार्क्स हॅरिस याचा समावेश केला आहे. यानंतरही सलामीला कोण हा प्रश्न त्यांना सुटलेला नाही. ज्यो बर्न्स फॉर्ममध्ये नसल्यामुळे मॅथ्यु वेड हा त्यांच्यासमोर सलामीला असलेला एकमेव पर्याय आहे. चेंडू लागल्यावर चक्कर येत असल्याची तक्रार करणारा कॅमेरुन ग्रीन त्यातून सावरला असेल, तर ऑस्ट्रेलिया अष्टपैलू म्हणून त्याचा विचार करू शकते. गोलंदाजीत ऑस्ट्रेलिया जोश हेझलवूड, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि नॅथन लियॉन यांचा विचार करू शकते.