एसआरए गैरव्यवहारप्रकरणी मंत्री प्रकाश मेहता दोषी; मंत्रिपद धोक्यात

0
804

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – मुंबईतील ताडदेवच्या एम.पी.मिल कंपाऊंड एसआरए गैरव्यवहारकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना  लोकायुक्त न्यायमूर्ती एम.एल. ताहली यांनी दोषी ठरवले आहे.  लोकायुक्तांच्या या अहवालात मेहता यांना आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली नसल्याचे म्हटले आहे. यामुळे मेहता यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. तर पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारच्या अडचणी वाढणार आहेत.

ताडदेव मिल कंपाऊंडमध्ये एसआरएला परवानगी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा प्रकाश मेहता यांच्याकडून या प्रकरणाच्या फाईलवर मारला होता.  प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्र्यांना याबाबत अवगत करण्यात आलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. खरेतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय लागू करण्या अगोदर  त्याला स्थगिती दिली. मात्र, निर्णय घेताना मेहता यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर केल्याचे अहवलात म्हटले आहे.

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  या अगोदरही एम. पी मिल एसआरए प्रकल्प मंजूर करून विकासक ए. डी. कार्पोरेशनला ५०० कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याचा प्रकाश मेहतांचा उद्देश होता, असा आरोप विरोधकांनी हा घोटाळा उघडकीस आणताना केला होता.