एवढे येऊ नका की आम्हालाच पक्षाबाहेर काढून टाकाल!- रावसाहेब दानवे

0
437

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – भाजपमध्ये सध्या मेगाभरती चालू आहे. नुकतेच इतर पक्षातील चार आमदार भेटून गेले. त्यांना सांगितले की, थोडे थांबा आणि प्रतीक्षा करा. एवढे येऊ नका की, आम्हालाच काढून टाकाल, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे ओबीसी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून सांगितले.

ते म्हणाले, सर्व समाजघटकांना स्थान देणारा पक्ष आहे. विधान परिषदेवर सहा सदस्य घेताना मराठा समाजातील राम रातोळीकर वगळता अन्य पाच सदस्य आम्ही बंजारा, कोळी, धनगर, ठाकूर आणि आगरी समाजातून घेतले. सरपंच, आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष आणि दोनदा केंद्रीय राज्य मंत्रिपद पक्षाने दिले. राजकारणात अपेक्षा कधी संपत नसते म्हणून पक्षाने मला पंतप्रधान करायचे की काय, त्यावर सभागृहात मुख्यमंत्री व्हा, असा आवाज आला. त्यानंतर दानवे म्हणाले, सध्या मुख्यमंत्री आपलेच आहेत आणि यापूर्वी मराठवाडय़ातील मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. पुन्हा एकदा मुख्यमंत्री जालना जिल्ह्य़ाचा हवा, असा आवाज आला आणि त्यावर हसत-हसत पुढच्या काळात विचार करू, असे दानवे म्हणाले.

पुढच्या वेळेस ओबीसी जनगणना होईल. केंद्र सरकारने ओबीसी आयोगास घटनात्मक दर्जा दिला आहे. त्यामुळे सरकारने काहीच केले नाही, असे चित्र निर्माण करू नका. आता तर आम्हीही ओबीसी झालो आहोत. देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत. तुम्हाला आणखी काय पाहिजे, असा सवाल करून दानवे यांनी व्यासपीठावर इतर पक्षातील नेत्यांना संधी आणि महत्त्व असल्याचे सांगून भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.

ओबीसी कार्यक्रमापूर्वी झालेल्या रेशीम दिन कार्यक्रमास रावसाहेब दानवे, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे उपस्थित होते.  रेशीम भवनाचे भूमिपूजन झाल्यावर राजेश टोपे स्वत:च्या गाडीत बसत असताना खोतकर यांनी त्यांना बोलावून घेतले आणि त्यानंतर तिघेही एकाच गाडीतून रेशीम दिन कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. यावेळी दानवेंना उद्देशून खोतकर म्हणाले,  टोपे यांना तुमच्याकडे घेता की आमच्याकडे? त्यावर व्यासपीठावरून तातडीने  टोपे यांनी नकारार्थी दोन्ही हात हलवीत आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. नंतर खोतकर यांनीही आपण बोललो तो भाग गमतीचा असल्याचे सांगितले.