उरण ओएनजीसी प्लांटला भीषण आग; ५ जणांचा होरपळून मृत्यू

0
412

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत ५ जण मृत्यू झाला आहे. तर, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन अग्निशमन जवानांचा समावेश असल्याचे समजते. प्लांटमध्ये आणखीही काही लोक अडकून पडल्याची भीती असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळी सातच्या सुमाराला लागलेली आग अजूनही भडकतच आहे. गंभीर जखमी झालेल्या कामगारांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग लिक्विड गळतीमुळे लागली आहे. आग लागली तेव्हा रात्रीपाळीचे कामगार कामावर होते. आग लागल्यानंतर तिथे मोठा गोंधळ उडाला. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच अनेक कामगार जखमी झाले. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. प्लांटमध्ये नेमके किती कामगार होते, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.