‘एल अँन्ड टी’ कंपनीवर कारवाईचे महापौरांचे आदेश

0
267

– नगरसेविकेचा फोन ‘रेकॉर्ड’ करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करणार

पिंपरी,दि.२१(पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात भर पावसाळ्यात खोदाई सुरू असल्याचा विषय आता गाजतो आहे. असंख्य नागरिक त्याबद्दल तक्रार करतात पण प्रशासनातील अधिकारी लक्ष देत नाही. आता नगरसेवकांनीही महापालिका सभेत खोदाई प्रकरणाचा पाढा वाचला आणि त्यांना आलेले अनुभव सांगितले. खोदाई करणारी कंपनी संबंधीत ठेकेदार यांची अरेरावी कशी चालते ते दोन नगरसेविकांना उघड केल्यावर प्रशासनाचे डोळे उघडले. त्यानंतर कंपनी आणि संबंधीत अधिकारी यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले.

नगरसेवक हा वॉर्डातील मंत्री असतो. त्याच्यावर प्रभागाची संपूर्ण जबाबदारी असते. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करुन दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणे अतिशय चुकीचे आहे. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करणाऱ्या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करा, असा आदेश महापौर उषा ढोरे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सर्वसाधारण सभेत दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागील दोन महिन्याच्या तहकूब सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) घेण्यात आली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यस्थानी आहेत.

सभेच्या सुरुवातीला भाजपच्या संत तुकारामनगर मधील नगरसेविका सुजाता पालांडे यांनी आपल्याला आलेला अनुभव सभागृहात सांगितला. प्रभागातील कामे होत नाहीत. अधिकारी कामाला टाळाटाळ करतात. कामांसाठी कनिष्ठ अभियंत्याला फोन केला असता अधिका-यांने फोन रेकॉर्ड केला. तो फोन दुस-या नगरसेवकाला ऐकवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या अधिका-यावर कारवाईची मागणी त्यांनी केली.

त्यानंतर दापोडीच्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनीही आपला अनुभव सांगितला. स्मार्ट सिटीअंतर्गत प्रभागात विकासकामे सुरु आहेत. त्याची कोणतीही माहिती दिली जात नाही. ठेकेदाराकडून दादागिरीची भाषा केली जाते. अशा ठेकेदारांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली. एल अँन्ड टी कंपनीच्या ठेकेदाराला भर पावसाळ्यात खोदाईबद्दल विचारणा केली असता उलट त्याच्याकडूनच दमदाटी झाली, असल्याचे शेंडगे यांनी सांगितले. संबंधीत कंपनी, ठेकेदार यांच्यावर कारवाईची आग्रही मागणी त्यांनी केली.

जेष्ठ नगरसेविका सिमाताई सावळे यांनीही आशा शेंडगे आणि सुजाता पालांडे यांना आलेले अनुभव अत्यंत विदारक असल्याचे सांगत प्रशासनावर तोफ डागली. नगरसेविकेला दमदाटी अथवा फोन रेकॉर्ड करण्याची हिंमत होतेच कशी असा खडा सवाल त्यांनी प्रशासनाला केला. संबंधीत कंपनी आणि अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी सिमाताई सावळे यांनीही आक्रमकपणे लावून धरली.

याप्रकरणी सभागृह नेते नामदेव ढाके यांनीही नगरसेविकांच्या तक्रारी अत्यंत गंभीर स्वरुपाच्या आहेत, त्यामुळे महापौरांनी आयुक्तांना कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी महापौरांकडे केली. सुरुवातीला महापौर ढोरे कारवाई करण्याचा आदेश देण्यास तयार होत नव्हत्या. त्यामुळे नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावर नगरसेवक हा वॉर्डातील मंत्री असतो. त्याच्यावर प्रभागाची संपूर्ण जबाबदारी असते. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करुन दुस-या नगरसेवकाला ऐकवणे अतिशय चुकीचे आहे. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करणा-या अधिका-याला तत्काळ निलंबित करा, असा आदेश महापौर ढोरे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिला. एल अँन्ड टी कंपनीवर कारवाईचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले.

स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराच्या तक्रारींवर महापौर ढोरे यांनी कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराला पाठिशी घातले जात आहे का, असा सवाल केला जात आहे.