एकनाथ खडसे भाजप सोडणार नाहीत, चंद्रकांत पाटलांना विश्वास

0
319

मुंबई,दि.९(पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजप सोडणार नाहीत, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजप पक्ष मोठा करण्यामध्ये एकनाथ खडसेंचा वाटा मोठा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईतील भाजपची संघटनात्मक बैठक संपल्यानंतर ते बोलत होते. याशिवाय आगामी महापालिका निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात भाजपचं जे संघटन आज उभं राहिलं आहे, त्यामध्ये एकनाथ खडसेचं योगदान मोठं आहे. गेल्या तीस वर्षात कोणत्याही एका पक्षाला विधानसभा निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकणे शक्य झालं नव्हतं, ते भाजपने करुन दाखवलं. यामध्ये गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह एकनाथ खडसेंचा मोठा वाटा आहे. एकनाथ खडसेंनी विरोधी पक्षात असताना अत्यंत प्रभावीपणे काम केलं. एकनाथ खडसे भाजपचे नेते आहेत. माणसं रागावतात त्यावेळी ते व्यक्त होतात. एकनाथ खडसे भाजप सोडण्याचा विचार करणार नाहीत, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.