एकनाथ खडसे चांगलेच खवळले म्हणाले, `मोदी गो बॅक` म्हणणाऱ्यांना उमेदवारी

0
381

जळगाव, दि. ८ (पीसीबी) : विधानपरिषदेवर जाण्यास उत्सुक असतानाही उमेदवारी डावलल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे खवळले आहेत. ‘मोदी गो बॅक’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्याला विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाते, असा शब्दात एकनाथ खडसेंनी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला.
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, तेली समाजातील नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे बालरोगतज्ञ डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांच्या नावावर फुली मारली. एकनाथ खडसे यांनी विधानसभेला तिकीट नाकारल्याबद्दल मनातील खदखद डिसेंबर महिन्यात गोपीनाथगडावरुन जाहीर बोलून दाखवली होती.

“तिघांची नावे शिफारस करुन पाठवण्यात आली होती. तिघांची नावे डावलून नवीन लोकांना संधी देण्यात आली”, अशी खदखद खडसेंनी माध्यमांकडे बोलून दाखवली.“गोपीचंद पडळकर यांनी काही दिवस आधी मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकून ‘गो बॅक मोदी’ असा नारा लगावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्याला विधानपरिषदेवर संधी दिली जाते. पण आम्ही चाळीस वर्षे निष्ठेने काम केले. भारतीय जनता पार्टी कोणत्या दिशेने चालली, यावर चिंतन करण्याची गरज असल्याचं खडसे म्हणाले.