एआयएसएसएमएसमध्ये आयोजित अलॅक्रिटीचे विजेतेपद कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने पटकावले

0
678

पुणे, दि. २५ (पीसीबी) – शिवाजीनगर येथील एआयएसएसएमएसच्या आयओआयटी महाविद्यालयात आयोजित सांस्कृतिक, तांत्रिक आणि क्रीडा अशा विविध स्पर्धांचा संगम असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील इव्हेंट अलॅक्रिटीची सांगता झाली. कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने अलॅक्रिटीचे विजेतेपद पटकावले.

या कार्यक्रमाला बीएमसी सॉफ्टवेअर इंडियाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी तरुण शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवनिर्मितीचा मार्ग अवलंबवण्यास सांगितले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या अलॅक्रिटीचे प्रमुख आकर्षण ठरली. सोनाली हिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पीच्या त्रिसूत्रीबद्दल म्हणजे पेशन्स, पॅशन्, प्रॅक्टिसवर भर देण्यास सांगितले.

महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमाचाही विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. या फेस्टीव्हलसाठी प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांचे मार्गदर्शन लाभले. या फेस्टीव्हलचे देवेंद्र इटोळे, कुणाल रणवीर, विकास देसाई हे समन्वयक होते. या राष्ट्रस्तरीय फेस्टमध्ये ६० हून अधिक स्पर्धा झाल्या. अलॅक्रिटीचे हे १० वे वर्ष असून त्यामध्ये केवळ इंजिनीरिंगचेच नव्हे, तर कला, वाणिज्य, विज्ञान, एमबीए, फार्मसी, विधी अशा पुणे आणि शहराबाहेरील १२० हून अधिक महाविद्यालयातून स्पर्धक सहभागी झाले. अलॅक्रिटीचे विजेतेपद कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिरिंगने पटकावले.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या संस्थेचे सचिव श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी प्रोत्साहन दिले. यावेळी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या संस्थेचे सह सचिव सुरेश प्रताप शिंदे, खजिनदार अजय पाटील, नियमन मंडळाचे सदस्य भगवानराव साळुंखे, निखिल खणसे, श्रीकांत मोझे आदी उपस्थित होते. विद्यार्थी सरचिटणीस ऋतुराज बोकील यांनी कार्यक्रमात आभार मानले.