एअर स्ट्राइकचे सॅटेलाईट फोटो  मिळाले; ‘जैश’ची इमारत सुस्थितीत

0
741

नवी दिल्ली, दि. ६ ( पीसीबी) – भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची प्रशिक्षण तळे उद्धवस्त केली, असा दावा  केला जात होता. मात्र, हल्ला केलेल्या ठिकाणांचे सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत. यामध्ये   जैश-ए-मोहम्मदच्या मदरशाची इमारत  सुस्थितीत असल्याचे दिसत आहे.  त्यामुळे एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे.

टाइम्स नाऊ’ने एअर स्ट्राइकचे पुरावे म्हणून १२ छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. सीक्रेट एअर फोर्स ऑपरेशनच्या छायाचित्रांच्या आधारे एअर स्ट्राइकमध्ये झालेले मोठे नुकसान स्पष्टपणे दिसत आहे, असा दावा केला आहे. मात्र, सॅन फ्रान्सिस्कोमधील एका खासगी सॅटेलाईटद्वारे बालाकोट येथील परिसराचे ४ मार्चला छायाचित्र घेण्यात आली. यात जैश-ए-मोहम्मदचे ६ मदरसे आजही  स्पष्टपणे दिसत आहेत. एअर स्ट्राईकनंतर सहा दिवसांनंतर हे फोटो प्रसिध्द करण्यात आले आहेत.

ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला होता तेथील स्पष्ट चित्र दिसणारे फोटो आतापर्यंत सार्वजनिकरित्या प्रसिध्द  करण्यात आले नव्हते. मात्र, प्लॅनेट लॅब्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये बालाकोट परिसर सुस्पष्ट दिसत आहे. या छायाचित्रांमुळे आता एअर स्ट्राईक मध्ये  ‘जैश ए मोहम्मद’ चे तळ भारताकडून उद्‌ध्वस्त केले होते का? असा प्रश्न उभा राहत आहे.