उपमुख्यमंत्री पदासाठी ‘ही’ तीन नावे चर्चेत?

0
737

मुंबई, दि.२७ (पीसीबी)- महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं नवं सरकार स्थापन झालं. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळलं. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे आता निश्चित झाले आहे. परंतु उपमुख्यमंत्री पदाच्या नावांवर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. सध्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील ही नावे उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अद्याप महाविकास आघाडीच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा झाली नसल्याची माहिती दिली. बाळासाहेब थोरात यांची नुकतीच काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अजित पवार यांना पदावरून काढत जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपासोबत सरकार स्थापन केलेल्या अजित पवार यांचंही नाव उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

उद्या उद्धव ठाकरे यांच्यासोबतच काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली. तसंच उपमुख्यमंत्री पदावर चर्चा झालेली नाही. कोणी हे पद घ्यायचे यावर चर्चा आज सुरू होतील. त्यानंतर निर्णय होतील. शपथविधीसाठी काँग्रेसचे नेते येणार आहेत. तो शासकीय कार्यक्रम असल्यानं सर्वांनाच याचं निमंत्रण देण्यात येईल. उद्या काही मंत्री शपथ घेतील. पण कोणी शपथ घ्यायची आणि किती जणांनी घ्यायची याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. प्रत्येक विभाग, खाती ही महत्त्वाची आहेत. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. पण प्रत्येकाला काही महत्त्वाची खाती मिळतील याची खात्री आहे, असेही ते म्हणाले.