उदयनराजेंना पाडण्यासाठी ‘हा’ उपाय करा; चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र    

0
558

सातारा, दि. ११ (पीसीबी) –  राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्याचे खासदार उद्यनराजे यांना लोकसभा निवडणुकीत हरविण्यासाठी कार्यकर्त्यांना एक उपाय सांगितला आहे. रात्री घरी जाताना एक खडू घेऊन जा आणि आपल्या घरातील भिंतीवर धनुष्यबाणाचे चिन्ह काढा आणि त्याच्याखाली लिहा ‘उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारच’ मग बघा कशी एनर्जी येते, असा सल्ला पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

सातारा लोलकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी   वाई येथे प्रचारसभा आयोजित केली होती. यावेळी मंत्री पाटील बोलत होते.  सातारा  मतदारसंघातून शिवसेनेकडून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.

पाटील म्हणाले की, भिंतीवर पुसल्या जाणाऱ्या खडूने  ‘उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारच’ असे लिहायचे आणि रोज घरातून बाहेर पडताना भाजप आणि शिवसेनेचा बॅच खिशाला लावूनच घराबाहेर पडायचे, असा सल्ला  त्यांनी  दिला. दरम्यान, उद्यनराजेंचा पराभव करण्यासाठी युतीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.