उत्तर प्रदेशला परतणाऱ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा थंड प्रतिसाद

0
380

प्रतिनिधी,दि.८ (पीसीबी) : मुंबई व महाराष्ट्रात राहणाऱ्या मूळच्या उत्तर प्रदेशच्या लाखो कामगारांना सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात सुरक्षितपणे आपल्या गावी परत जाता यावे यासाठी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या सविस्तर उपाययोजनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने अत्यंत सरकारी व थंड प्रतिसाद मिळाला आहे. उलट याच तोडग्याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः पत्र पाठवून राज्यात परतणाऱ्या सर्वांची योग्य व्यवस्था करण्याची हमी दिली आहे.

महाराष्ट्र व गुजरातमध्ये राहणाऱ्या मूळच्या उत्तर प्रदेशच्या नागरिकांसाठी काम करणाऱ्या मुंबईतील उत्तर प्रदेश डेव्हलपमेंट फोरमने सध्याच्या प्रसंगात काय करता येईल याचा सविस्तर उपाय सुचविणारे पत्र मा. राम नाईक यांना पाठविले होते. मुंबईत छोट्याश्या खोल्यात मोठ्या संख्येने राहणाऱ्या मूळच्या उत्तर प्रदेशच्या कामगारांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर काय होईल या कल्पनेने ते अधिक धास्तावले आहेत. त्यामुळे या कामगारांना वेळीच व सुरक्षितपणे आपापल्या घरी परत जाता यावे यासाठी या फोरमने विविध उपाय सुचविले. त्यामध्ये सरकारने कामगारांच्या स्थलांतरासाठी प्रवासाची सोय करण्याबरोबरच जे लोक स्वखर्चाने जाऊ शकतात त्यांना केवळ परवानग्यांची आणि नियमनाची मदत कशी करावी हे सुद्धा स्पष्ट केले होते. मा. राम नाईक यांनी हे स्वयंस्पष्ट पत्र शिफारशीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविले. तीन दिवसांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडून मा. राम नाईक यांना आपला ई मेल मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे, असे सरकारी थंड उत्तर देण्यात आले.
मा. राम नाईक यांनी वरील सूचनापत्राची प्रत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथी यांनाही पाठविली होती. त्यांनी मात्र या विषयाची दखल घेऊन स्वतः पत्र पाठविले. उत्तर प्रदेश राज्यात विविध अकरा राज्यातून मूळचे उत्तर प्रदेश निवासी परतत असून मार्च महिन्यात सहा लाख नागरिक परतल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी राम नाईक यांना पाठविलेल्या पत्रात दिली आहे. उत्तर प्रदेश सरकार आपल्या राज्यात परतणाऱ्यांसाठी कशा प्रकारे सुविधा देत असल्याचे स्पष्ट करून योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातून परतणाऱ्या अशा कामगारांसाठी सर्व प्रकारे सहकार्य करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.