इस्लामसाठी ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमचा बॉलिवूडला रामराम

0
529

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) –  राष्ट्रीय पुरस्कार विजेती आणि ‘दंगल’फेम अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूडला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड करियरला आता कुठे सुरुवात झालेली असताना झायराने घेतलेल्या या निर्णयामुळे तिच्या फॅन्ससह संपूर्ण बॉलिवूडला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

झायराने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून बॉलिवूडला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली आहे. पाच वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आयुष्य बदलून गेले. बॉलिवूडमध्ये आल्याने नवी ओळख मिळाली. त्यामुळे मी खूश आहे. या इंडस्ट्रीत आल्यानंतर लोकांनी भरभरून प्रेम केले आणि पाठबळही दिले, असे सांगतानाच अभिनेत्री बनल्यामुळे इस्लाम धर्मापासून काहीसा दूरावा निर्माण झाला होता. धर्म आणि माझ्यातील अंतर कमी करण्यासाठीच मी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतल्याचे झायराने स्पष्ट केले आहे. सिनेमात काम करणे हे ‘इमान’च्या विरोधात असल्याचेही तिने म्हटले आहे.

झायराने अत्यंत भावनिक होऊन तिच्या मनातील भावना इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. प्रसिद्धी मिळाल्याचा तिला आनंदही आहे. नवी लाइफस्टाइल, प्रसिद्धी आणि नवे कल्चर या सगळ्यात फिट बसत असल्याचेही ती सांगते, मात्र त्यासाठी आपला जन्म नसल्याचेही ती अधोरेखित करते. म्हणूनच गेल्या पाच वर्षात इस्लामपासून दूर जात असल्याची खंत तिला सतत जाणवत आहे. तरीही जे काही सुरू आहे, ते योग्यच आहे, अशी मनाची समजूतही तिने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र इस्लामच्या मार्गावरून चालण्यास एकदा नव्हे शंभरदा अपयशी ठरल्याची भावना पक्की झाल्यानेच तिने बॉलिवूडला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.