इतर राज्यातून परतलेले नागरिक ठरत आहेत कोरोनाचे वाहक; अनेक राज्यांची डोकेदुखी वाढली

0
441

प्रतिनिधी,दि.९ (पीसीबी) : देशात कोरोना वायरसचा संसर्ग वाढल्याने ३ मे रोजी संपणारा ४० दिवसांचा लॉकडाऊन पुन्हा १४ दिवसांनी वाढविण्यात आला. लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या नागरिकांचा घरी परतण्याचा मार्ग केंद्र शासनाने मोकळा केला. मात्र पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा सारख्या अनेक राज्यात परतलेले नागरिक कोरोना पाॅझिटीव असल्याचे समोर येत आहे. इतर राज्यातून परतणारे नागरिक कोरोनाचे वाहक ठरत असल्याने अनेक राज्यांची डोकेदुखी वाढली आहे.

लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकलेले लोकांना घरी परतण्याची योजना २९ एप्रिल रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केली. इतर राज्यात अडकलेल्या लोकांना परत आणण्यापूर्वी त्यांचे स्क्रिनिंग केल्यावर ज्या लोकांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळणार नाही अशा लोकांनाच परतण्याची परवानगी देण्यात आली. तसेच आपल्या राज्यात परतल्यावर त्यांना क्वाॅऱंटाईऩ व्हावे लागणार व कोरोनाची लक्षणे तपासण्यासाठी त्यांची नियमितपणे तपासणी करावी लागणार असे शासनाने निश्चित केले. विविध राज्यांमध्ये लाखो प्रवासी कामगारांनी आपल्या राज्यात परतण्यासाठी नोदणी करण्यासाठी अर्ज करायला सुरुवात केली. तसेच कोरोनाची लक्षणे नसल्याबाबत डॉक्टरचे फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी रांगा लावल्या. रेल्वे मंत्रालयाच्या वतीने विशेष श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना आपापल्या राज्यात परत पाठवण्याची सुरुवात देखील केली. तसेच काही राज्यांनी अशा
लोकांना परत आणण्यासाठी बसेसची व्यवस्था देखील केली. परंतु इतर राज्यातून परतलेले नागरिक कोरोना पाॅझिटीव असल्याचे समोर आल्याने तेथील प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. नांदेड येथील गुरुद्वारातून पंजाबला परतलेल्या १००० पेक्षा जास्त भाविकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने पंजाब सरकार हतबल
होऊ लागले आहे. हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा अश्या अनेक राज्यात परतलेले नागरिक कोरोना बाधित असल्याचे आढळून येत आहेत. इतर राज्यातून परतणारे नागरिक कोरोनाचे वाहक ठरत असल्याने अनेक राज्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडीशा सारख्या काही राज्यांनी आपल्याच नागरिकांना स्वीकारायला मनाई करण्यास सुरुवात केली आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक परतले तर अशा नागरिकांना क्वॅरांटाईन करणे अशक्य आहे. तसेच इतक्या
मोठ्याप्रमाणात नागरिक परत आले तर त्यांचे कोविड १९ ची टेस्ट करण्यासाठी पर्याप्त प्रयोगशाळा अनेक राज्यात उपलब्धच नाहीत. कोरोनाचे कोणतीच लक्षणे नसलेले सायलंट कॅरिअर्समुळे गावागावात कोरोना पसरण्याच्या शक्यतेने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. मात्र या सर्व प्रकारामुळे प्रवासी कामगारांचे अतोनात हाल होऊ लागले आहेत. एकीकडे लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने नोकरीहि गेली आणि पैसेही संपले आहेत, तर दुसरीकडे गावाला परतण्याचे मार्ग सुद्धा बंद होऊ लागले आहेत. यासर्व परिस्थितीवर केंद्र शासन काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.