इंडोनेशियामध्ये त्सुनामी; १६८ जणांचा मृत्यू

0
742

जकार्ता, दि. २३ (पीसीबी) – इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा आलेल्या त्सुनामीमध्ये १६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६०० जण जखमी झाले आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने ही त्सुनामी आल्याचे सांगितले जात आहे. त्सुनामीमुळे अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री ९.३० वाजता ही त्सुनामी आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अनाक क्राकाटाओ ज्‍वालामुखीचा उद्रेक झाल्याने त्सूनामी आल्याचे इंडोनेशियाच्या हवामान खात्याने सांगितले आहे. पौर्णिमामुळे यात आणखी भर पडली. त्यामुळे उंच उंच लाटा उसळल्या. इंडोनेशियाचे सरकार यामागील सत्य शोधण्याच्या कामात लागले आहे. तर काही अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, ही त्सूनामी नाही, तर फक्त उंच लाटा आहेत.

शनिवारी रात्री आलेल्या या उंच लाटांमुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. याआधी सप्टेंबरमध्ये इंडोनेशियाच्या सुलावेसी द्वीपजवळ भूकंपामुळे उत्पन्न झालेल्या त्सुनामीमध्ये ८३२ जणांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती राष्ट्रीय आपात्कालीन विभागाचे प्रवक्ता स्तुपो पुर्वो यांनी दिली आहे.