इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांनी पालकांवर शालेय शुल्क भरण्यासाठी दबाव टाकू नये – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

0
417

 

मावळ, दि.१८ (पीसीबी) – राज्यातील सर्व इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांनी पालकांवर शालेय शुल्क भरण्यासाठी दबाव टाकू नये, असे केल्यास कडक कारवाईचा इशारा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

लॉकडाऊन मध्ये मागील एक महिन्यापासून राज्यासह मावळ तालुक्यातील शाळा महाविद्यालये यांना सुट्या देण्यात आल्या आहेत. संचारबंदी काळात रोजगाराचे सर्व मार्ग बंद असल्याने पालकांना विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्क भरणे शक्य नाही. असे असून देखील अनेक शाळा पालकांवरती शाळेची फि भरण्यासाठी दबाव टाकत असल्याची पालकांची तक्रार आहे.या पालकांची तक्रारीची दखल घेत राज्यातील सर्व इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांनी पालकांवर शालेय शुल्क भरण्यासाठी दबाव टाकू नये, असे केल्यास कडक कारवाईचा इशारा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये परिसरातील मध्यम वर्गातील नागरिकांची मुले देखील शिक्षण घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे नागरिकांपुढे कमवण्याचे कोणतेही साधन नाही. या संकटात दोन वेळेचे जेवण मिळवणे देखील मुश्किल झाले आहे. अशातच शाळांकडून विशेषतः इंग्रजी व बड्या शाळांकडून पालकांनी मागील व नवीन शैक्षणिक वर्षांतील शालेय शुल्क भरावे, असे सांगितले जात आहे. यामुळे पालक मोठ्या संकटात सापडले आहेत. सध्याचा काळ कठीण असल्याने शालेय व्यवस्थापनाने देखील सहकार्य करावे व पालकांकडून शालेय शुल्क मागू नये, असे परिपत्रक शिक्षण विभागाकडून काढण्यात आले होते.

शासनाच्या सुचनेनंतर देखील अनेक शाळा पालकां कडून शालेय शुल्क भरण्यासाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अशा प्रकारे फि भरण्यासाठी मागे लागणाऱ्या शाळांवर थेट कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच राज्यातील शाळांकडून विद्यार्थी किंवा पालकांना शुल्काची मागणी होत असल्यास यासंबंधी आपल्या जिल्हाच्या शिक्षणाधिकारी कार्यलयाकडे तक्रार करावी असे सांगितले आहे.