आशिया करंडक २०२३ पर्यंत लांबणीवर

0
222

दुबई, दि.२४ (पीसीबी) : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातील संकटे दिवेंदिवस वाढत आहेत. कोविड १९च्या संकटामुळे आधीच ही स्पर्धा पुढे ढकलून २०२१ मध्ये घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र, आता ही स्पर्धा २०२३ पर्यंत होऊच शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोविड १९च्या संकटामुळे ही स्पर्धा पाकिस्तानातून श्रीलंकेत हलविण्यात आली. पुढी ल वर्षी ही स्पर्धा घेण्याचे ठरले. पण, आता व्यग्र कार्यक्रमामुळे ही स्पर्धा ठरल्या वेळेत होऊच शकत नाही. कोविड १९च्या संकटकाळात अनेक स्पर्धांचा कालावधी मागेपुढे करावा लागला असून, त्याचा फटका आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेला बसत आहे. आशिया करंडक घेण्यासाठी कालावधीच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही स्पर्धा २०२३ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

क्रिकेट खेळणारे आशियातील चारही प्रमुख देश पूर्वनिोजित कालावधीत उपलब्धच होऊच शकत नाहीत. त्यामुळे ही स्पर्धा यावर्षी घेणे कठिण असल्याचे आशियाई क्रिकेट समितीने स्पष्ट केले.

या स्पर्धेसाठी २०२३ पर्यंत वेळच नाही. त्यात २०२२ ची आशिया करंडक स्पर्धा देखील आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या तारखा निश्चित झाल्यानंतर कळविण्यात येतील, असेही आशियाई समितीने म्हटले आहे. विशेष म्हणजे २०१८ पासून आशिया करंडक स्पर्धाच झालेली नाही. त्यानंतर २०२०ची स्पर्धा कोविडमुळे रद्द करण्यात आली. गेल्या दोन स्पर्धा भारताने जिंकल्या आहेत. ही स्पर्धा कार्यक्रमानुसार दर दोन वर्षांनी होते.