आशियाई बॉक्सिंग: शिवा, हुस्सामुद्दिनची आगेकूच

0
190

दुबई, दि.२५ (पीसीबी) : भारताच्या शिवा थापाने (६४ किलो) सलग पाचव्या आशियाई पदकाची मोहिम सुरू करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याच्याबरोबर मोहंमद हुस्सामुद्दिन (५६ किलो) यानेही आपली आगेकूच कायम राखली.

भारतासाठी पहिला विडय हुस्सामुद्दिनने मिळविला. त्याने ५६ किलो वजन गटात कझाकस्तानच्या मखमुद साबिरखान याला हरवले. त्यानंतर शिवाने किर्गिझस्तानच्या दमित्री पुशिन याला हरवले. दोघा भारतीय मल्लांनी ५-० असाच विजय मिळविला.

हु्स्सामुद्दिनची आता खरी कसोटी लागणार आहे. त्याची गाठ सध्याचा जागतिक आणि आशियाई विजेत्या मिराझीबेक मिर्झाहालिलोव याच्याशी पडणार आहे. हुस्सामुद्दिनला पहिल्या फेरीत १९ वर्षिय आशियाई युवा विजेत्या मखमुद साबिरखान याने कडवा प्रतिकार केला. त्याने सुरवातीपासून आक्रमक खेळ केला. त्याला हुस्सामुद्दिने उत्तर दिले, पण एका आघाडीर साबिरखान सरस ठरत होता. अर्थात, बचावाच्या आघाडीवर आपणच सर्वोत्तम असल्याचे हुस्सामुद्दिनने दाखवून दिले. या आघाडीवर साबिरखान फिका पडला. हुस्सामुद्दिनच्या प्रतिआक्रमणापुढे फिका पडला.

शिवाला मात्र पहिल्या विजयासाठी फारसे प्रयास पडले नाहित. पुशिन त्याला लढत देऊ शकला नाही. माजी विजेत्या शिवासमोर त्याला आपल्या खेळाचे नियोजन बदलावे लागले. त्याने आक्रमण जरूर केले. पण, त्याला शिवाचा बचाव भेदता आला नाही. तीनही फेऱ्यात शिवाने एकतर्फी वर्चस्व राखले. त्यामुळे जज्जेसना शिवाच्या बाजूने निर्णय देणे कठिण गेले नाही.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आज ऑलिंपिक पात्र सिमरनजित कौर (६० किलो), साक्षी (५४ किलो), जस्मिन (५७ किलो), संजित (९१ किलो) या चौघी आपले कौशल्य पणाला लावतील. महिला विभागात कमी प्रवेशिका आल्यामुळे त्या थेट उपांत्यपूर्व फेरीची लढत खेळणार आहेत.

भारताचा अन्य एक बॉक्सर सुमीत संगवान (८१ किलो) याला पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. त्याला इराणच्या मेसाम घेश्लाघी याने ५-० असे पराभूत केले.