आळंदी येथे तीर्थक्षेत्र केंद्र, तर लोणी काळभोर येथे जीवविज्ञान स्मार्ट शेती केंद्र उभारण्यात येणार

0
516

आळंदी, दि.१० (पीसीबी) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएने महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांसह पीएमआरडीए हद्दीचा विकास आराखडा जाहीर केला आहे. या विकास आराखड्यानुसार आळंदी येथे तीर्थक्षेत्र केंद्र, तर लोणी काळभोर येथे जीवविज्ञान स्मार्ट शेती केंद्र उभारण्यात येणार आहे. चाकण, वाघोली आणि हिंजवडी येथे उपप्रादेशिक केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्या त्या भागातील होत असलेल्या प्रगतीनुसार संबंधित क्षेत्राचे केंद्र उभारण्यात येणार असल्याचे पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले.

या विकास आराखड्यानुसार चाकण येथे ऑटोमोबाईल हब, तर वाघोली येथे आयटी हब उभारण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी खडकवासला, यवत आणि केडगाव येथे प्रवासी केंद्र तयार करण्यात येणार आहे. शेती उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी खेड-शिवापूर आणि उरुळी कांचन येथे, तर औद्योगिक केंद्र तळेगाव येथे सुरू करण्यात येणार आहे. नसरापूर येथे हेरिटेज टुरिझम आणि शैक्षणिक केंद्र, शिक्रापूर येथे औद्योगिक केंद्र, तर पिरंगुट येथे माहिती तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई येथे वाढलेल्या परिक्षेत्रामुळे त्या ठिकाणी चित्रपटांसाठी जागा उपलब्ध होत नाही. गोरेगाव येथे असलेल्या फिल्म सिटीच्या धर्तीवर मळवली या ठिकाणी भव्य फिल्म सिटी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नव्या विकास आराखड्यामध्ये तब्बल ७३ हेक्टर जागेची गरज भासणार असून, त्या ठिकाणी माध्यमांसाठी सर्व सोयीयुक्त सुविधाही उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर हिंजवडी येथे उपप्रादेशिक केंद्राबरोबरच आयटीचेही हब तयार करण्यात येणार आहे. याबाबतची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. काही प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले असून, त्याप्रमाणे पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे दिवसे यांनी या वेळी सांगितले.