आळंदीत उष्ण लोखंडी द्रवाचे शिंतोडे अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

0
421

आळंदी, दि. २९ (पीसीबी) – काम करण्यासाठी लागणारी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था न पुरवल्याने एका कंपनीतील कामगाराच्या अंगावर उष्ण लोखंडी द्रवाचे शिंतोडे अंगावर पडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मरकळ येथील संत ज्ञानेश्वर प्रा. लि या कंपनीत घडली.

देवराज किर्तन नायक असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार शिवाजी चासकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कंपनीचे मालक दयाशंकर मातब्बर राय याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवराज हा मरकळ येथील संत ज्ञानेश्वर प्रा. लि या कंपनीत कामाला होता. ही कंपनी दयाशंकर राय यांच्या मालकीची आहे. या कंपनीत लोखंड पिगळवून जॉब तयार केले जातात. गुरुवार (दि.७) मार्च सायंकाळी साडेपाचच्या सुमारास देवराज नेहमी प्रमाणे कंपनीत कामाला गेला होता. काम करताना त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली नव्हती. तेव्हा अचानक त्याच्या अंगावर उष्ण लोखंडी द्रवाचे शिंतोडे पडले आणि तो गंभीर भाजला गेला. त्याला एक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनीचे मालक दयाशंकर राय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.