आळंदीतून तब्बल सहा लाखांचा गुटखा जप्त

0
1105

आळंदी, दि. २१ (पीसीबी) – विक्रीसाठी आणलेला तब्बल सहा लाखांचा विविध कंपन्यांचा गुटखा गुन्हे शाखेकडी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका मिनी टेम्पोतून जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास आळंदी-मरकळ रोड, गोळेगाव फाटा येथे करण्यात आली.

अशोक भगाराम पटेल (वय २७, रा. रामनगर रहाटणी, कोकणे बिल्डींग, रुम नं. १३, वाकड. मुळ रा. रामपुरा ग्रामपंचायत कलाली, ता रोहीट, जि. पाली, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ हे स्टाफसह आळंदी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस शिपाई अशोक गारगोटे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, आळंदी-मरकळ रोड, गोळेगाव फाटा येथील एका टेम्पोमध्ये गुटखा आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून (एमएच/१४/ईएम/४३९८) या क्रमांकाच्या मिनी टेम्पो मधील आर.एम.डी, रजनीगंधा आणि विमल अशा विविध कंपन्यांचा एकूण ६ लाख ४६० रुपयांचा गुटखा जप्त केला. तसेच आरोपी टेम्पोचालक अशोख पटेल या अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे तसेच पोलीस कर्मचारी राजेंद्र बांबळे, प्रदिप शेलार, राजन महाडीक, रमेश भिसे, बाळासाहेब सुर्यवंशी, दिनकर भुजबळ, अशोक गारगोटे आणि दादा धस यांच्या पथकाने केली.