आली दिवाळी! औद्योगिकनगरीतील बाजारपेठा खरेदीसाठी गजबजल्या

0
701

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – दिवाळी सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. औद्योगिकनगरीतील बाजारपेठा दिवाळीच्या आगमनामुळे सजल्या आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी आबालवृध्दांसह नागरिकांची बाजारपेठामध्ये झुंबड उडाली आहे. शहरातील रस्ते नागरिकांच्या गर्दीने ओसांडून वाहू लागले आहेत. पिंपरी बाजारपेठेत सायंकाळनंतर खरेदीसाठी नागरिकांची रेलचेल होऊ लागली आहे.

दिवाळीसाठी दुकानदार, फेरीवाले, व्यापारी, मिठाई दुकानदार सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठांमध्ये विविध रंगाच्या, आकाराच्या आकाशकंदील दाखल झाले आहेत. लाईटच्या माळा, सजावटीच्या पताका, रंगीत बल्ब, आदी साहित्याने दुकाने सजली आहेत. पणत्या, रांगोळ्या खरेदी करण्यात महिला वर्गांची लगबग दिसून येत आहे. तर बच्चे कंपनींनी फटाक्यांची खरेदी करण्यासाठी फटाक्यांच्या दुकानात गर्दी केली आहे.

दिवाळीनिमित्त कापड दुकानदारांनी विविध डिझाईनचे कपडे विक्रीसाठी ठेवले आहेत. विविध रंगसंगती आणि नव्या फॅशनचे कपडे खरेदी करण्यास तरूणाई पसंती देत आहे. दिवाळी फराळाचे स्टॉल सर्वत्र दिसून येत आहेत. सध्या तयार फराळाच्या पदार्थांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तर लहान मुलांचे आकर्षण असलेल्या किल्ल्यांची प्रतिकृती, मावळे, चित्रे बाजारात दाखल झाल्या आहेत. दरम्यान बाजारपेठांमध्ये खरेदीमुळे वाहतूक कोंडी होत असून वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.