‘आला रे आला सगळ्यांचा बाप योगेश आला, मला जो नडला त्याला उभ्याने तोडला’; कोयता हवेत फिरून दहशत माजवल्याप्रकरणी तरुणाला अटक

0
450

बिजलीनगर, दि. ११ (पीसीबी) – ‘आला रे आला सगळ्यांचा बाप योगेश आला, मला जो नडला त्याला उभ्याने तोडला’ असे म्हणत लोखंडी कोयता हवेत फिरून दहशत निर्माण केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. चिंचवड पोलिसांनी मंगळवारी (दि. 10) सायंकाळी ही कारवाई केली.

योगेश अनंता गायकवाड (वय 25, रा. नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी निवास धनंजय विधाटे यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या कब्जात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगला. ‘आला रे आला सगळ्यांचा बाप योगेश आला, मला जो नडला त्याला उभ्याने तोडला’, असे मोठ्याने ओरडत आरोपीने कोयता हवेत फिरवला. लोकांना धमकी देत हनुमान स्वीटच्या दिशेने तो जात होता. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.