आरक्षण घेतल्यामुळे मराठा समाजही सरकारी जावई – प्रकाश आंबेडकर

0
446

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – एकेकाळी आरक्षणावरून आम्हाला सरकारी जावई म्हणून चिडवणारा मराठा समाज आज स्वत:च आरक्षण घेऊन सरकारी जावई झाला, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

अनुसूचित जाती, अनु. जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी कवी सुरेश भट सभागृहात शिष्यवृत्ती परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, १९७२, ७३, ७४ साली अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे मोर्चे निघायचे. तेव्हा मराठा समाजाचे लोक आम्हाला ‘सरकारी जावई’ असे चिडवायचे. पण, आता काळ बदलला. काळाने अशी परिस्थिती निर्माण केली की जे आम्हाला एकेकाळी  ‘सरकारी जावई’ म्हणायचे तेच ‘सरकारी जावई’ झाले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. सुरुवातीपासून मी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आलो, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

जातीवर आधारित आरक्षणाबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले, जोपर्यंत विषम व्यवस्था आहे, शिक्षणात विषमता आहे आणि जोपर्यंत सरकार शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत नाही, तोपर्यंत आरक्षणाशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्र सरकार देशातील सर्वात प्रतिगामी सरकार आहे. केंद्र सरकार शिष्यवृत्तीसाठी जेवढी रक्कम पाठवते, तेवढीची रक्कम वितरित केली जाते. राज्य सरकार त्या रकमेत भर घालत नाही. इतर राज्य सरकारे मात्र जेवढी रक्कम केंद्र सरकार पाठवते तेवढीच रक्कम स्वत:ही देतात.