‘आय.एन.एस. खांदेरी’ पाणबुडीचे संरक्षण मंत्र्यांचे हस्ते जलावतरण

0
651

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – भारतीय बनावटीच्या ‘आय.एन.एस. खांदेरी’ या पाणबुडीचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज (शनिवार) जलावतरण करण्यात आले. कलवरी श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी असून डिझेल-विद्युत प्रकारातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे.

या प्रसंगी राजनाथ सिंग म्हणाले की, मुंबईवर २६/११ रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तसाच कट आता पुन्हा रचला जात आहे. तो आता यशस्वी होऊ देणार नाही. कोणीही देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. तर नौदलाकडून त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल.

आयएनएस खांदेरीमुळे भारतीय नौदलाची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे, हे पाकिस्तानने आता लक्षात ठेवावे. देशातील सशस्त्र दलांच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आधुनिकीकरणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही  ते म्हणाले.

या पाणबुडीची बांधणी माझगाव डॉकने केली आहे. सध्या नौदलाकडील पाणबुडींची संख्या मर्यादित असून खांदेरीमुळे नौदलाच्या सामरिक ताकदीत वाढ होणार आहे. ‘खांदेरी’च्या बांधणीचे काम एप्रिल २००९ मध्ये सुरू करण्यात आले होते. जून २०१७ पासून ऑगस्ट २०१९ पर्यंत तिच्या चाचण्या घेण्यात आल्या.