आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावावर अभिप्राय देण्यास टाळाटाळ

0
163

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील कनिष्ठ कर्मचा-यांमार्फत आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावावर वरिष्ठ अधिकारी अभिप्राय देण्यास टाळाटाळ करतात. यापुढे वरिष्ठ अधिका-यांनी केवळ स्वाक्षरी न करता स्पष्ट अभिप्राय द्यावा. स्पष्ट अभिप्राय न देता फाईल (नस्ती) सादर केल्यास विभागप्रमुख, नियंत्रण अधिकारी यांनी जबाबदार धरण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी काढला आहे.

महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर शेखर सिंह विविध विभागांचा अभ्यास करत आहेत. सर्व विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन कामात सुसूत्रता ठेवून शिस्त पाळण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सिंह सर्वच फाईली बारकाईने अभ्यासत आहेत. त्यामुळे फाईलीमधील विविध त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या आहेत. महापालिकेतील विविध विभागांचे प्रमुख, नियंत्रण अधिकारी यांच्यामार्फत महापालिका कामकाजाशी संबंधित विविध प्रकल्प, प्रशासकीय, तांत्रिक तसेच अन्य कामकाजाबाबतच्या फाईली (नस्त्या) आयुक्तांकडे निर्णयासाठी पाठविल्या जातात. आयुक्त शेखर सिंग यांनी अशा फाईलींचे अवलोकन केले.

संबंधित विभागातील कनिष्ठ कर्मचा-यांमार्फत आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावावर विभागातील पर्यवेक्षकीय अथवा वरिष्ठ अधिका-यांमार्फत कोणत्याही प्रकारचा स्पष्ट शेरा, अभिप्राय नसतो. केवळ स्वाक्षरी अथवा ‘आदेशार्थ’ असे उल्लेख करुन स्पष्ट अभिप्राय देण्याचे टाळले जाते. ही बाब कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी आहे. त्यामुळे प्रशासकीय निर्णय घेण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे यापुढे आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविताना केवळ स्वाक्षरी न करता प्रस्तावाबाबत स्पष्ट अभिप्राय, शेरे द्यावेत. स्पष्ट अभिप्राय न देता फाईल सादर केल्यास संबंधित विभागप्रमुख, नियंत्रण अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.