आम्ही खराब खेळलो

0
202

मेलबर्न, दि.२९ (पीसीबी) : पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यातील दणकेबाज विजयानंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. दडपणाखाली भारतीय संघाने आपला खेळ उंचावून दुसरा कसोटी सामना ८ गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना जिंकला असला, तरी त्या विजयात गोलंदाजांचा मोठा वाटा होता. फलंदाजीत त्यांना अजून लय गवसलेली नाही. डेव्हिड वॉर्नरची उणिव त्यांना भासतीय, त्यात स्टिव स्मिथही आपला सूर गमावून बसलांय. त्यांचे नवे फलंदाज गुणवत्तेला न्याय देऊ शकत नाहीयेत. दुसऱ्या डावात त्यांनी २०० ची मजल मारली हच मोठी गोष्ट. दोन सामन्यात त्यांना ते देखिल जमले नव्हते. पहिल्या कसोटीत १९१ धावा आणि दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात १९५ धावा अशी त्यांच्या फलंदाजांची अवस्था होती. या सामन्यात तर एकही अर्धशतक त्यांच्याकडून झळकले नाही. विशेष म्हणजे १९८८ पासून मेलबर्नवर अशी वेळ ऑस्ट्रेलियावर प्रथमच आली.

वॉर्नरला खेळवणार ?
ऑस्ट्रेलियन फलंदाजीची वाताहात बघता त्यांना वॉर्नरची उणिव प्रकर्षाने भासतीयं. दुखापतीमुळे तो पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. जैव सुरक्षा कवचाच्या नियमामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यातही त्याचा समावेश कठिण असल्याचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांना वाटत आहे. पण, सध्याची स्थिती लक्षात घेता निवड समितीला नियम बाजूला ठेवून वॉर्नरला खेळवावे लागणार असेच वाटत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया कर्णधार टिम पेन याने आम्ही खराब क्रिकेट खेळत असल्याचे मान्य केले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पेन म्हणाला,’आम्ही खूप निराश आहोत. संपूर्ण सामन्यात आम्ही खूपच खराब खेळ केला. अर्थात, असे म्हणून भारतीयांच्या यशाचे श्रेय हिरावून घ्यायचे नाही. त्यांनी सुरवातीपासून आम्हाला या सामन्यात दडपणाखाली ठेवले. त्यांनी आम्हाला चुका करायला भाग पाडल्या आणि आम्ही त्या करत गेलो.’

पेन याने भारतीय गोलंदाजीचेही कौतुक केले. तो म्हणाला,’भारतीय गोलंदाजांनी कमाल मारा केला. आजपर्यंत पाहिलेली भारतीय गोलंदाजांची ही सर्वोत्तम फळी आहे. फलंदाज म्हणून आम्ही त्यांचा सामना करूच शकलो नाही. मालिकेतील अजून दोन सामने बाकी आहेत आणि आम्ही या वेळी केलेल्या चुका भविष्यात नक्कीच सुधारु.’