आमदार लक्ष्मण जगताप यांचा चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल

0
771

पिंपरी, दि. ३ (पीसीबी)  – पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे गुरूवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज दाखल केला. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा कुंभार यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

यावेळी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट, राज्यसभा खासदार अमर साबळे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, भाजपच्या महिला आघाडी प्रदेश सदस्य उमा खापरे, भाजपचे शहर प्रवक्ते व सरचिटणीस अमोल थोरात, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे आदी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आमदार जगताप यांनी मी केवळ चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी नव्हे; तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. माझ्या मतदारसंघातील नागरिकांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. मी त्यांच्या विकासाबद्दलच्या स्वप्नांना तडा जाऊ दिलेला नाही. मतदारसंघातील सर्व नागरिकांचे आशिर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी तिसऱ्यांदा नक्कीच मोठ्या मताधिक्याने जिंकणार, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.