“आपला लढवय्येपणा महाराष्ट्राच्या दुश्मनांबरोबर दाखवता येईल”

0
353

मुंबई, दि.१(पीसीबी) – आपला लढवय्येपणा महाराष्ट्राच्या दुश्मनांबरोबर दाखवता येईल, असं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मराठी जनतेने शिवरायांचा जयजयकार करीत मुंबईसह महाराष्ट्र स्थापनेचा मोठा लढा दिला. 105 हुतात्म्यांची आहुती देत दिल्लीच्या तख्ताला झुकवून संयुक्त महाराष्ट्र मिळवला. त्या महाराष्ट्राचा हिरक महोत्सव त्याच तोलामोलाने साजरा झाला असता, पण ज्याने मोरारजींच्या अंदाधुंद गोळीबाराची पर्वा केली नाही तो महाराष्ट्र आज एका विषाणूशी लढत आहे. अर्थात, असे अनेक विषाणू महाराष्ट्राच्या मुळावर आले व संपले. राज्य स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावतच आला आहे. त्या प्रगतीरथास कोरोनाच्या संकटामुळे ब्रेक लागेल काय, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र हा लढवय्या आहे व तो या संकटाला परतवून लावेल. हे लढवय्येपण महाराष्ट्राच्या दुश्मनांबरोबर दाखवता येईल, पण ही लढाई राज्याच्या अस्मितेची, उद्योगधंदे, रोजगार वाचविण्याची आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दीड महिन्यापासून राज्यात टाळेबंदी आहे. उद्योग-व्यापारास टाळे आहे व आतापर्यंत तीन लाख कोटींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान राज्याच्या प्रगतीस खिळ घालणारे आहे. विजयी उन्मादाच्या आरोळय़ा ठोकून, राजकीय कुरघोडय़ा करून हे संकट दूर होणार नाही. शेवटी ‘महाराष्ट्र धर्म’ नावाचा जो मंत्र आहे तो काही जादुटोणा किंवा अंधश्रद्धा नाही. हा मंत्र मराठीजनांच्या घामातून, श्रमातून निर्माण झाला आहे, असं राऊत यांनी आपल्या अग्रलेखात म्हटलं आहे.