आता, लोकेश राहुल देखिल जखमी

0
492

सिडनी, दि. ५ (पीसीबी) : भारतीय संघासमोरील चिंता सातत्याने वाढत आहेत. वेगवान गोलंदाज उमेश यादव पाठोपाठ राखीव यष्टिरक्षक फलंदाज लोकेश राहुलही जखमी झाला, असून तो देखिल मायदेशी परतणार आहे. सरावा दरम्यान राहुलच्या मनगटाला दुखापत झाली असून, उपचारासाठी त्याला मायदेशी परतावे लागणार आहे. मायदेशात परतल्यावर तो रिवाजानुसार थेट राष्ट्रिय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमात दाखल होईल.

समीकरणे बदलणार
सिडनी कसोटीसाठी राहुलच्या समावेशाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, राहुलच्या जखमी होण्याने ही समीकरणे बदलणार यात शंका नाही. मयांक अगरवाल,हनुमा विहारी यांना वगळले जणार असेच मानले जात होते. त्यांच्या जागी रोहित, राहुल यांची निवड अपेक्षित होती. यात राहुलच जखमी झाल्याने पुन्हा एकदा विहारीचे संघातील स्थान कायम राहिले आहे.

यानंतरही विहारीला वगळण्यावर संघ व्यवस्थापन ठाम राहिले, मयांकला मधल्या फळीत खेळावे लागेल आणि रोहित-शुभमन भारतीय डावाची सुरवात करतील. मयांकला संघातून वगळो अथवा न वगळो, त्याला रोहितसाठी सलामीचे स्थान गमवावे लागणार हे नक्की मानले जात आहे. गोलंदाजीत महंमद सिराज संघात कायम राहणार यात शंका नाही. पण, जखमी उमेश यादवच्या जागी योग्य गोलंदाज घेण्याकडे आमचा कल असेल, असे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मान्य केले.

शार्दुल ठाकूर आणि टी. नटराजन असे पर्याय भारताकडे उपलब्ध आहेत. शार्दुला संधी मिळाली, तर तो फलंदाजी करू शकतो हा विचार केला जाईल. पण, नटराजनला संधी दिली, तर तो डावखुरा असल्यामुळे आपल्या नैसर्गिक शैलीमुळे क्रीजवर फुटमार्क तयार करू शकतो. पुढे या फुटमार्कचा फायदा अश्विन आणि रवींद्र जडेजा या भारतीय फिरकी गोलंदाजांना मिळू शकतो. असा विचार केला जाऊ शकतो.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारतासाठी दोन्ही सामने महत्वाचे आहेत. दुसरीकडे न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीतही विजयाच्या मार्गावर असल्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढत आहेत. सहाजिकच भारतीय संघाला आता दोन्ही सामन्यात विजयासाठीच प्रयत्न करावे लागणार आहेत. हा सगळा विचार करून भारतीय थिंक टॅंक बुधवारी आपला अंतिम संघ जाहिर करेल.