आता मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अमित ठाकरे घेणार का?; अमित ठाकरेंनी दिलं उत्तर…

0
849

मुंबई, दि.१७ (पीसीबी) : शुक्रवारी आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, त्यापाठोपाठ मनसेकडून आता आदित्य शिरोडकर सांभाळत असलेल्या मनसे विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार, यावर तुफान चर्चा रंगू लागली आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर नजीकच्या काळात मोठी राजकीय जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. सध्या मनसे नेतेपद असणाऱ्या अमित ठाकरे यांच्याकडेच आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासूनच जोरदार चर्चा सुरू असताना आता खुद्द अमित ठाकरे यांनी देखील तसे संकेत दिले आहेत.

अमित ठाकरे नाशिकमध्ये असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी या मुद्द्यावरू भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणार असल्याबद्दल अमित ठाकरेंना पत्रकारानी विचारणा केली. त्यावर सूचक शब्दांमध्ये अमित ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. “सगळ्यांचं प्रेम बघून मी भारावून गेलोय. कालपासून मला फोन येत आहेत की तुम्ही ही जबाबदारी घ्या. साहेब जी जबाबदारी देतील ती पार पाडेन. त्यांनी नेतेपदाची जबाबदारी दिली, त्या पदाला जितका शक्य होईल तितका न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. पुढे देखील जी जबाबदारी दिली जाईल ती मी घ्यायला तयार आहे”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

नाशिक महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी सध्या राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत. त्यापाठोपाठ त्यांनी अमित ठाकरेंना देखील तातडीने नाशिकला बोलवून घेतलं आहे. त्यामुळे अमित ठाकरेंवर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची चर्चा सुरू झाली होती. एकीकडे नाशिक पालिका निवडणुकांमध्ये अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वाटत असतानाच आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता अमित ठाकरे यांच्यावर मनविसे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

आदित्य शिरोडकर यांनी शुक्रवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. खुद्द पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य शिरोडकर यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचा पक्षप्रवेश सुनिश्चित केला. यावेळी आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांची उपस्थिती होती. एकीकडे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी देखील राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येताना युवासेनेचीच जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारी घेऊन राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.