‘अमित शाह यांच्याकडे सहकार खातं गेल्यानंतर हालचाली निश्चित वाढणार’

0
203

नवी दिल्ली, दि.१७ (पीसीबी) : शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं झाल्यानंतर त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क लढवले जाऊ लागले आहेत. गेल्या महिन्याभरात शरद पवारांनी अनेक नेत्यांसोबत भेटीगाठी केल्या आहेत. आणि शरद पवारांची भेट म्हटल्यावर त्यावर मोठी राजकीय चर्चा देखील झाली आहे. आज शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यापूर्वी गुरुवारी त्यांनी वर्षा निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली होती. या भेटीत राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीगाठींच्या राजकारणावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर आज दिल्लीत त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांच्या गुरुवारच्या भेटीनंतर दिलेली आपली प्रतिक्रिया पुन्हा ट्वीट केली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पवारांना खोचक टोला देखील लगावला आहे.

मुनगंटीवारांनी शेअर केलेल्या या व्हिडीओसोबत “अमित शाह यांच्याकडे सहकार खातं गेल्यानंतर हालचाली निश्चित वाढणार आहेत!” असं ट्वीट केलं आहे. शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरची त्यांनी दिलेली प्रतिक्रिया या व्हिडीओमध्ये आहे. “सहकार खातं गेल्यानंतर हालचाली तर नक्कीच वाढणार आहेत. या हालचाली या भितीपोटी आहेत की आत्तापर्यंत एकाधिकार होता. राजेशाही होती. मनात जे आलं, ती कृती सत्तेचा उपयोग करून केली जायची. आता हा जनतेच्या अधिकारांचा अंकुश असणार आहे. आता तुम्हाला स्वैराचार करण्यास बंदी असणार आहे. पण शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट सहकार कायद्याच्या संदर्भात असेल असं वाटत नाही”, असं मुनगंटीवार या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत.

दरम्यान, यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांच्या राजकीय भेटीगाठींवर देखील खोचक टोला लगावला आहे. “अनेकदा असं होतं की जेव्हा शरद पवार भेट घेतात, तेव्हा राजकीय चर्चा झाली असा आपल्याला भास होतो किंवा अशी चर्चा होते. मागची एक भेट डायमंड असोसिएशनच्या लोकांसाठी जागा मागण्यासाठी झाली होती. त्यांच्या प्रश्नांसंदर्भात झाली. पण माध्यमांमधून दुसरंच रूप दिलं जातं. अशा भेटींचा उद्देश राजकीयच असतो असं नाही. इतकी वर्ष पवार साहेब राजकारणात आहेत. त्यामुळे अनेक संघटना सरकारपर्यंत प्रश्न पोहोचवण्यासाठी पवारांच्या नेतृत्वाचं माध्यम वापरत असाव्यात”, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी गेले होते. महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. जवळपास अर्धा तास शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानावरून महाविकास आघाडीत सध्या नाराजी आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांची निवडणुकीबाबतही खलबतं सुरु आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडणूक कशी पार पडेल? या संदर्भातही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या चर्चेतील तपशील सध्या गुलदस्त्यातच आहे. या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.