आठवलेंचे १५ लाख देण्याचे विधान म्हणजे डिसेंबरमध्ये एप्रिल फुल – कन्हैय्या कुमार

0
690

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकणार आहे, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. याविधानाची विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने खिल्ली उडवली आहे. आठवले यांचे विधान म्हणजे डिसेंबरमध्ये एप्रिल फुल करण्यासारखे आहे, असा टोला लगावला आहे. १५ लाख तर विसरुन जा, या सरकारच्या काळात आपल्या खिशातील पैसेही वाचवणे  अवघड झाले आहे, असे कन्हैय्या कुमार  यांनी म्हटले आहे.

विदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकांना १५ लाख रुपये देणार आहे, असे आश्वासन मोदी यांनी दिले  होते. आता त्यांना आरबीआयचा राखीव निधी लाटायचा आहे, असेही तो म्हणाला.

दरम्यान, रामदास आठवले यांनी मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये टाकणार असल्याचे म्हटले होते. सोलापूरमध्ये एका पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. तसेच जीएसटीचा कर कमी करणे, पेट्रोलियम पदार्थाचे दर आणि महागाई कमी करण्याचे प्रयत्न  सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मुद्दाही एनडीएच्या बैठकीत मांडला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.