‘आजीचे निधन झाल्याची खोटी माहिती दिल्याने न्यायालयाने नितीन लांडगे यांचा जामीन फेटाळला’

0
797

– स्थायी समितीच्या अन्य १५ सदस्यांचीही चौकशी होणार

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी न्यायालयास अंतरिम जामीन मिळण्यासाठी आजीचे निधन झाल्याची खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जामीन मिळण्यासाठी केलेले लांडगे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अंतरिम जामीन ना मंजूर झाल्याने लांडगे यांची न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान, स्थायी समितीच्या अन्य १५ सदस्यांची चौकशी कऱण्याचे फर्मान निघाले आहे.

आजीचे (आईची आई) निधन झाल्याने तिच्या अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमास जायचे आहे, असे कारण सांगून लांडगे यांनी अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करीत २६ ऑगस्टपर्यंत जामीन देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात लांडगे यांच्या आजी नाही तर वडिलांच्या मावशीचे निधन झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायायलात दिली. त्यामुळे लांडगे यांचा जामीन फेटाळून लावण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केला.

स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय 56, रा. भोसरी), शिपार्इ अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. लांडगे यांनी यापूर्वी नियमित जामीनासाठी अर्ज केला आहे. इतर आरोपींनी देखील मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जनांवर शुक्रवारी ( तारीख 27) सुनावणी होणार आहे.

दरम्यान, सदर गुन्ह्याच्या पडताळणीत उल्लेख झालेले ते १६ जण म्हणजे स्थायी समितीचे सदस्य यांच्याकडे चौकशीकरणे बाकी असून त्यांच्यात व अटक केलेल्या ५ आरोपींमध्ये काही रॅकेट आहे का याचा तपास बाकी असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधिक्षक सीमा मेहंदळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आता स्थायी समितीच्या त्या सदस्यांकडे लाचलुचपतचा मोर्चा वळणार असल्याने महापालिकेत खळबळ आहे.