आगामी मुख्य सचिव कोण ? सिताराम कुंटे की प्रविणसिंह परदेशी…

0
244

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मुख्य सचिव संजय कुमार पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी वर्णी लावण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याची चर्चा मंत्रालयात आहे. सीताराम कुंटे हे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर प्रवीणसिंह परदेशी संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर आहेत. महाआघाडीतील तीनही घटक पक्षांची सहमती महत्वाची असणार आहे.

सीताराम कुंटे यांचीच अधिक शक्यता –
सीताराम कुंटे हे 1985 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सध्या कार्यरत आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही होते. 2012 ते 2015 या कालावधीत मुंबई महापालिकेचे आयुक्तपदी त्यांनी काम केले. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक विभाग हाताळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून अनुभव आहे. परदेशी यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचा शिक्का असल्याने कुंटे यांच्या नावावर महाआघाडीतील तीनही पक्षांचे एकमत होईल अशी चर्चा आहे.

प्रवीण परदेशी यांच्यावर शिक्का –
प्रवीण परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. दिवंदत मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांचे ते जावई होत. परदेशी हे संयुक्त राष्ट्रसंघात (UNITAR) Global Programme Coordinator म्हणून कार्यरत आहेत.

मे 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी असल्याचं सांगण्यात येतं. फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास व महसूल अशा विविध विभागांत जबाबदारी सांभाळलेली आहे. 1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते.

लातूरमधील कामाचा धडाका पाहून परदेशींची मोठी प्रशंसा झाली होती. फडणवीस यांनी परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आणले होते. परदेशी यांच्यावर फडणवीस यांनी नेहमीच विश्वास दाखवला होता. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही परदेशी यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती.

कुंटे-परदेशी एकाच बॅचचे –
कुंटे आणि परदेशी एकाच बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. दोघेही येत्या नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत. म्हणजेच दोघांपैकी एकाची नियुक्ती झाली, तर मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ हा नऊ महिन्यांचाच असेल.