आकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

0
268

आकुर्डी, दि. २३ (पीसीबी)
– आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ गुरुद्वारा चौकातील पुलाजवळील पाणीपुरवठा पाइपलाईन आज (गुरुवारी) दुपारी दोनच्या सुमारास आवाज होऊन फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले.

 पुलाखालील सकल भागातही पाणी वाढले.पाण्याचा अंदाज न आल्याने तीन दुचाकीस्वार त्यात अडकले. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील हे दक्ष समिती विभागीय पदाधिकारी विजय मुनोत,विशाल शेवाळे, नितीन मांडवे,संतोष चव्हाण यांच्यासमवेत तिथे पोहचले. तातडीने पाण्यात बंद पडलेल्या दुचाकस्वारांना पाण्यातून काढले. तातडीने महापालिकेला “सारथी” मदत नंबर  कळविण्यात आला. तोपर्यंत लाखो लिटर पाणी ओढ्यामध्ये वाहून गेले. दुपारी काही काळ ओढ्याला पूर आल्याप्रमाणे पाणी वाहत होते.

विजय पाटील म्हणाले, “पावसाळ्यापूर्वी ओढे, नाले पूर्ण साफ असणे आवश्यक आहे. ओढ्यात माती व झुडपांची वाढ झाल्याने पाण्यास अडथळा निर्माण होवून ओढे धोकादायक पद्धतीने वाहण्यास सुरुवात होते. त्यामुळे जवळच्या खोलगट भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. दुचाकीस्वार अशा पाण्यातही वाहन घेऊन जाण्याचा धोका पत्करतात व फसतात. यासाठी पुलाखालील साचलेल्या पाण्यात नागरिकांनी वाहने चालवू नये आणि संकटाला आमंत्रण देवू नये. शहरात पाणीपुरवठा पाईप्स फुटण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेही दक्षता बाळगणे व वेळेवर देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे.त्यामुळे अशा घटना टाळता येतील.”