आकुर्डीत आलीशान कारमधुन आलेल्या चोरट्यांनी दुचाकीस्वाराला लुटले

0
485

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – स्कॉडा या आलीशान कारमधून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी एका दुचाकीस्वाराला धडक दिली. तसेच त्याला जबर मारहाण करून त्याच्याजवळी ११ हजार रुपये रोख चोरुन नेले. ही घटना शनिवारी (दि. २) सायंकाळी सातच्या सुमारास आकुर्डीतील बस स्टॉपजवळ घडली.

ज्ञानदेव भानुदास तरंगे (वय 43, रा. रॉयल कासा सोसायटी, डी. वाय. पाटील रोड, रावेत) असे मारहाण करुन लुटण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्कोडा कारमधून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी तरंगे हे त्यांच्या दुचाकीवरून आकुर्डीतील बस स्टॉपजवळून जात होते. यावेळी स्कोडा कार (क्र.एमएच/१४/एव्ही४६४६) ने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर दुचाकीला कार आडवी लावून तरंगे यांना शिवीगाळ आणि हाताने मारहाण करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील अकरा हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनावणे तपास करत आहेत.