अॅंडरसन, लीचने केले भारताला पराभूत

0
240

चेन्नई, दि.०९ (पीसीबी) : अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसन आणि डावखुरा फिरकी गोलंदाजॅक लीच यांनी मंगळवारी भारताला पराभूत केले. त्यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने एम.ए. चिदमबरम मैदानावर झालेला पहिला कसोटी सामना २२७ धावांनी जिंकला.

अॅडरसनने ३, तर लीचने चार गडी बाद करताना विजयासाठी ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारताला दुसऱ्या डावात इंग्लंडने १९२ धावांत रोखले. लीचने पकडलेला अचूक टप्पा आणि अॅंडरसनचे रिव्हर्स स्विंग भारतीय फलंदाजांच्या पचनी पडले नाही.कर्णधार विराट कोहलीची ७२ धावांची खेळीही भारता पराभव टाळू शकली नाही. अखेरच्या दिवसातील दुसऱ्या सत्रातच इंग्लंडने विजयाला गवसणी घातली.

चौथ्या दिवशी रोहितला बाद करणाऱ्या लीचनेच आज सकाळी भारताला पहिला धक्का दिला. मधल्या यष्टिवर टप्पा पडून फिरलेल्या चेंडूने पुजाराच्या बॅटची कड घेतली आणि स्लिपमध्ये बेन स्टोक्सने झेल घेत पुजारा नावाची भिंत पाडण्यात आपला हातभार लावला. पण, सामन्याला खरी कलाटणी दिली ती आजच्या दिवसातील जेम्स अॅंडरसनच्या पहिल्या षटकाने. पहिल्या डावात लिचचा समाचार घेणारे भारतीय दुसऱ्या डावात डॉम बेसवर तुटून पडले होते. त्यामुळे जुना झालेला चेंडू ज्यो रुटने जेम्स अॅंडरसनच्या हाती सोपविला. पहिल्या चेंडूपासून त्याला रिव्हर्स स्विंग मिळत होता. चेंडूचा टप्पा जरा खोलवर ठेवत अॅंडरसनने प्रथम शुभमन गिलचा त्रिफळा उडवला. त्यानंतर एक चेंडू खेळल्यावर पुढच्या चेंडूवर अजिंक्य रहाणे पायचित असल्याचे इंग्लंडचे अपील मैदानावरील पंचांनी फेटाळून लावले. तिसऱ्या पंचांनीही अंपायर्स कॉल देत त्याला नाबाद ठरवले. पण, पुढच्याच चेंडूवर रहणेचा त्रिफळा उध्वस्त केला.

त्यानंतर त्याने रिषभ पंतला बाद केले. चेंडूच्या टप्प्याचा पंतचा अंदाज चुकला आणि हवेत गेलेला चेंडू ज्यो रुटने अचूक पकडला. अॅंडरसनचा हा पहिला स्पेलच (५-३-६-३) सामन्याचे चित्र स्पष्ट करणारा ठरला. त्यानंतर कोहलीचे अर्धशतक आणि त्याची फलंदाजी हा भारतासाठी केवळ अनौपचारिक होती. अश्विन अॅंडरसन आणि आर्चरच्या बाऊन्सरनी शेटकटून निघाला. पहिल्या सत्रातच पाच विकेट गेल्याने भारताच्या हाती फार काही उरलेच नव्हते. पराभव किती लांबतो इतकेच पहायचे होते. पण, ती वेळ ही आली नाही. पहिल्या डावामध्ये सपाटून मार खाणाऱ्या लीचने आज भारतीय फलंदाजांना जेरीस आणले. फिरणाऱ्या खेळपट्टीवर त्याने कमालीचे चेंडूचा टप्पा अचूक पकडला होता. त्याच्या टप्पाने भारतीय फलंदाजांना चकवले.

सकाळी गिलने दाखवलेली वृत्ती नंतर येणारा एकही फलंदाज दाखवू शकला नाही. बचावात्मक खेळण्याच्या नादात त्यांनी स्वतःवरील दडपण अधिक वाढवले. कोहलीने एकाबाजून जरुर सुरेख फलंदाजी केली., पण समोरून त्याला साथ मिळू शकली नाही. रहाणे अपयशी ठरला, पंतही सातत्य राखू शकला नाही. त्याउलट रुटने कमालीचा संयम राखला. गोलंदाजीत केलेले बदल नक्कीच त्यांच्या पथ्यावर पडले. अॅंडरसनला दुसऱ्या डावात उशिराने गोलंदाजीला आणणे आणि इंतराच्या विश्रांतीसाठी स्टोक्सचा वापर करणे आणि पहिल्या डावात मार खालेल्या लीचवर दुसऱ्या डावात कमालीचा विश्वास दाखवणे हे रुटचे सगळे निर्णय एकदम अचूक ठरले. त्याचबरोबर दुसरा डाव लवकर न सोडण्यावरून क्रिकेट पंडिताच्या टिकेला चढलेली धार आज पाचव्या दिवशी गोलंदाजांनी अचूक मारा करून बोथट केली.

ऑस्ट्रेलियातील चमकदार कामगिरीनंतर घरच्या खेळपट्टीवर भारतीय आपली चमक दाखवू शकले नाहीत. संघनिवडीपासून चुकलेल्या गणिता नंतर नशिब नाणेफेकीपासून भारतीयांवर रुसले. जागितक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे जाणारा मार्ग भारतीयांसाठी आता कठिण झाला आहे. भारत चौथ्या क्रमांकावर घसरला असून, इंग्लंडने पहिले स्थान गमावले आहे. भारताला आता ही मालिका किमान २-१ अशा फरकाने जिंकावीच लागेल. त्याचवेळी इंग्लंडला उर्वरित तीन सामन्यात दोन विजय आणि एक निकाल अनिर्णित आवश्यक आहे.

संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड ५७८ आणि १७८ वि.वि. भारत ३३७ आणि १९२ (विराट कोहली ७२ (१०४), शुभमन गिल ५० (८३), जॅक लिच ४-७६, जेम्स अॅंडरसन ३-१७)